आपण कोण आहोत? कुठून आलो? कुठे जाणार? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. खरेच, आपले आयुष्य किती? मुळात, आयुष्य म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू या दोन घटनांमधला कालखंड? एवढाच त्याचा अर्थ होतो का? तर नाही. मला वाटते, मानव जन्म ही फार महत्वाची आणि गुंतागुंतीची गोष्ट आहे.
आपल्याकडे मोक्ष ही एक संकल्पना आहे. मोक्ष म्हणजे काय, तर जन्म-मृत्युच्या चक्रातून सुटका होणे. यामागची कल्पना अशी की, आपला आत्मा हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. (पुनरपि जननम् पुनरपि मरणम्, पुनरपि जननी जठरे शयनम् ). आता ह्यातली गोम अशी आहे की, आपल्याला (म्हणजे बहुतेकांना) आपला पूर्वीचा जन्म आठवत नसतो. म्हणजे, आपल्याला पूर्वीचा जन्म होताच, असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. तेव्हा, असे चक्र असतेच, असे आपण कशाच्या आधारावर म्हणतो? शिवाय, मोक्ष प्राप्ती झाली म्हणजे नक्की काय झाले? मोक्ष मिळालेला एखादा जीव हे आपल्याला कथन करू शकतो का? आणि नसेल, तर आपल्याला मोक्ष म्हणजे काय हे नेमके कसे कळणार?
जन्म, मृत्यू, आयुष्य, मोक्ष ह्या सर्व गोष्टींवर मानव सतत विचार करत आला आहे. आणि ते साहजिकच आहे. मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. जिज्ञासा ही आपली नैसर्गिक भावना आहे. अनेक जण ह्या आयुष्य-कोड्याची उकल करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालतात. तरीसुद्धा, अजूनपर्यंत तरी हे कोडे उकललं आहे असे ठामपणे म्हणता येत नाही.
पण मग मी असा विचार करतो, की जर का हे प्रश्न, हे कोडे इतके गहन असेल, तर मग आपण ह्याची उकल करण्यात आपला वेळ आणि आपले आयुष्य कशाला व्यर्थ घालवायचे? मागच्या आणि पुढच्या जन्माचे ज्ञानच जर आपल्याला नाही, तर मग त्याचा विचार कशाला करायचा? त्यापेक्षा, आहे तो जन्म चांगल्या प्रकारे व्यतीत करून सार्थकी लावणे हेच जास्त संयुक्तिक नाही का?
आयुष्य ही जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधील, योगायोगांची अखंड अशी साखळी आहे. प्रत्येक क्षण हा एक योगायोगच असतो. तेव्हा, आलेला प्रत्येक क्षण हा भरभरून जगण्यासाठीच असतो. नाही का?
मी माझे आयुष्य जास्तीत जास्त उत्कृष्ट पद्धतीने जगीन. मी स्वतः आनंदी राहीन आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवीन. माझ्यावरील सर्व जबाबदार्या मी सर्वतोपरी पार पाडीन. ज्या समाजात मी राहतो त्याचे ऋण मान्य करून ते शक्य तेवढे फेडीन. 'देता देता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावे' हे मी सतत ध्यानात ठेवीन. हे जग सुंदर आहे. ते जग मी आणखी सुंदर करीन.
अशा प्रकारचे समृद्ध जीवन जगल्यावर, न जाणो, पण तो मोक्ष का काय म्हणतात तो मला कदाचित मिळेलही..
Welcome to my Blogspot
16 years ago
No comments:
Post a Comment